कृत्रिम बुद्धिमत्ता : एक सफर

- अशिती जोईल.

Pratahkal    04-Jul-2025
Total Views |
 
 
 
कृत्रिम बुद्धिमत्ता : एक सफर
 
- अशिती जोईल.
 
 
आई :  "अगं पूर्वी, तुझ्या मावशीसाठी मी एक छानसं गिफ्ट बघतेय, सोबत मला तिच्यासाठी एक छानसा शुभेच्छापर संदेश                लिहायचाय, जरा मदत करशील का?"
 
 
पूर्वी (लॅपटॉपमध्ये बघत) :   "अरे वा! हे तर मस्त आहे! घे ना. आणि नवीन, छान लिहायचंय म्हणतेस तर हे बघ, ChatGPT                                                 वापरून पटकन लिहूयात."
 
 
आजकाल घराघरांत असे संवाद सहज ऐकायला मिळतात. ChatGPT, AI, Gemini यांसारखे शब्द आपल्या रोजच्या व्यवहारात वापरले जातात. पण हे सर्व नक्की आहे तरी काय ? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ?  याबाबत आजही अनेक समज-गैरसमज समाजात आढळतात. म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून आपण 'कृत्रिम बुद्धिमत्ता' म्हणजे काय, तिचे कार्य, ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू.
 
 
कृत्रिम बुद्धिमत्ता : एक सफर 
 
 
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) हा सध्याच्या काळातील एक परवलीचा शब्द झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे अशी संगणकीय प्रणाली - जी माणसासारखी विचार करू शकते, शिकू शकते आणि निर्णय घेऊ शकते. माणूस जसा अनुभवातून शिकतो, तसेच AI सुद्धा मोठ्या प्रमाणात डेटा वापरून आणि विशिष्ट अल्गोरिदमच्या साहाय्याने शिकतो. ही प्रक्रिया 'मशीन लर्निंग’ (Machine Learning) म्हणून ओळखली जाते. या मशीन्स/यंत्रांकडून जेव्हा यापेक्षाही अधिक गुंतागुंतीच्या पातळीवर शिकण्याची प्रक्रिया घडते, तेव्हा ती ‘डीप लर्निंग’ (Deep Learning) म्हणून ओळखली जाते.
 
 
 
AI कार्यरत होण्यासाठी तीन मूलभूत घटक आवश्यक असतात: नैसर्गिक बुद्धिमत्ता, गणितीय रूपांतरण आणि संगणकीकरण. याचा अर्थ असा, की नैसर्गिक बुद्धिमत्तेचा अभ्यास करून ती गणिती संकल्पनांमध्ये रूपांतरित केली जाते आणि मग संगणकाद्वारे कृती साध्य केली जाते. हे लक्षात येण्यासाठी आपण खालील चित्र पाहू शकता. 
 
 
 
कृत्रिम बुद्धिमत्ता : एक सफर
 
 
हे अधिक स्पष्टपणे समजण्यासाठी एक सोपे उदाहरण पाहूया. समजा, एक मुंग्यांचे वारूळ आहे.‌ त्याच्या विरुद्ध दिशेला काही अंतरावर साखरेचे दाणे पडले आहेत. सर्वप्रथम मुंग्या जेव्हा अन्न गोळा करण्यासाठी वारूळाबाहेर पडतील, तेव्हा अन्न शोधण्यासाठी त्या वेगवेगळ्या दिशांना जातात . कारण अन्न नेमके कुठे आहे हे त्यांना माहीत नसते . त्या चालताना त्यांच्या वाटेवर फेरोमोन नावाचं रसायन सोडतात. ज्या वाटेवर जास्त साखर असते किंवा जेथे अधिक प्रमाणात साखरेचे खडे आहेत, तेथे  त्या मुंग्या हे रसायन अधिक प्रमाणात सोडतात . त्यामुळे, इतर मुंग्यांना साखर कुठे आहे हे कळण्यास मदत होते. परिणामी, इतर सर्व मुंग्या त्या दिशेने जातात आणि साखर मिळवता, ही नैसर्गिक बुद्धिमत्ता म्हणता येईल. हा अल्गोरीदम समजण्यासाठी वरील चित्र पाहू शकता.  AI याच धर्तीवर कार्य करतो  पर्यावरणातील माहिती गोळा करतो, विश्लेषण करतो आणि योग्य निर्णय घेतो.
 
 
कृत्रिम बुद्धिमत्ता : एक सफर 
 
 
आज AI च्या साहाय्याने चेहरा ओळखणे, भाषांतर करणे, ट्रॅफिकचा अंदाज बांधणे, ग्राहक सेवा देणे अशा अनेक गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. अगदी तुमचा मोबाईल असिस्टंट -Siri, Alexa किंवा Google Assistant हेही AI चे उदाहरण आहे. यंत्रे आता केवळ आदेश पाळत नाहीत, तर शिकतात, समजतात आणि योग्य प्रतिसादही देतात.
 
 
AI ही मानवी बुद्धिमत्तेचे संगणकावर आधारित अनुकरण करणारी प्रणाली आहे. ती फक्त सुसंवाद किंवा मनोरंजनापुरतीच मर्यादित नाही, तर वैद्यकीय निदान, शेती, शिक्षण, संरक्षण, वाहतूक आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये ती आज प्रभावी ठरत आहे.
 
 
कृत्रिम बुद्धिमत्ता : एक सफर
 
 
थोडक्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणकात विचार करण्याची, शिकण्याची आणि स्वयंचलित कृती करण्याची क्षमता निर्माण करणे होय. पण या प्रगत तंत्रज्ञानासोबत अनेक समज-गैरसमजही वाढले आहेत. त्यामुळे AI चे नेमके स्वरूप समजून घेणे हे काळाची गरज आहे.
 
 
पुढील भागात आपण या AI संदर्भातील काही सामान्य गैरसमज, त्यामागची कारणे आणि वस्तुस्थितीबद्दल चर्चा करू. तूर्तास, धन्यवाद!