मुलुंडमधील बर्ड पार्कसाठी बीएमसीने केली प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती

Pratahkal    08-Apr-2024
Total Views |
Mulund Bird Park
 
मुंबई: ईशान्य मुंबईच्या पर्यटन आणि विकासाला चालना देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नुकतीच मुलुंडमधील बर्ड पार्क (Mulund Bird Park) प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे. एचकेएस डिझायनर अँड कन्सल्टंट इंटरनॅशनल कंपनी लिमिटेड या सल्लागाराने बर्ड पार्कचा मसुदा विकास आराखडा बीएमसीकडे सादर केला आहे.
 
मुलुंडचे आमदार आणि भाजपचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी बीएमसीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. शुक्रवारी बीएमसीच्या प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात कोटेचा यांनी पालिका प्रशासनाने या रखडलेल्या प्रकल्पाचे काम जलदगतीने हाती घेण्याची मागणी केली आहे. तसेच, बर्ड पार्क प्रकल्पासाठी आवश्यक त्यापरवानग्या राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन असेही म्हटले आहे. एचकेएस डिझायनर अँड कन्सल्टंट इंटरनॅशनल कंपनी लिमिटेडने सादर केलेल्या मसुदा -आराखड्यानुसार, मुलुंड (पश्चिम) मध्ये १७,१५० चौरस -मीटर क्षेत्रफळावर बर्ड पार्क तयार केले जाईल. यात इंटरप्रिटेशन सेंटर, किड्स झोन, ऑस्ट्रेलिया झोन, आफ्रिका झोन, अमेरिका झोन, सार्वजनिक सुविधा असे वेगवेगळे झोन असतील. या बर्ड पार्कमध्ये विविध प्रकारचे पक्षी आणि त्याच्या प्रजाती असतील.
 
भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानानंतर मुलुंड बर्ड पार्क हे मुंबईतील सर्वात मोठे आकर्षण असेल. ते निश्चितच ईशान्य मुंबईतील पर्यटनाचे केंद्र बनेल. हे बर्ड पार्क आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्यासाठी बीएमसीने योग्य ती कारवाई केली पाहिजे, असे कोटेचा म्हणाले.
 
कोटेचा यांनी महापालिका प्रशासनाला बर्ड पार्कची पुढील प्रक्रिया जलद गतीने करण्यास सांगितले. मी स्वतः या पक्षी उद्यानासाठी आवश्यक राज्य तसेच केंद्र सरकारकडून लागणाऱ्या आवश्यक परवानग्या मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. त्यामुळे, प्रकल्प जलद गतीने मार्गी लावण्यासाठी बीएमसीने त्वरीत पुढील कार्यवाही हाती घ्यावी, असे ते पुढे म्हणाले.
 
कोटेचा पुढे म्हणाले की महापालिका प्रशासनाच्या साहाय्यासाठी जागतिक दर्जाचे बर्ड पार्क असलेल्या सिंगापूरसारख्या देशांशी आंतरराष्ट्रीय स्तरावर संवाद सुरू केला आहे. मी लवकरच ती माहिती महापालिकेसोबत सामायिक करेन, असेही ते म्हणाले.