राहनाळ शाळेत इकोफ्रेंडली होळी धुळवड

Pratahkal    26-Mar-2024
Total Views |
Eco Friendly Holi
 
कल्याण, (वार्ताहर) : भारतीय संस्कृतीतील सण समारंभ उत्सव म्हणजे आनंदाचा ठेवा. बदललेल्या पर्यावरणाच्या वातावरणामध्ये नैसर्गिक आणि इकोफ्रेंडली होळी (Eco Friendly Holi) साजरी करणे ही काळाची गरज ठरत आहे. अशाच वेळी जिल्हा परिषद शाळा राहनाळ (Rahnal School) इकोफ्रेंडली होळी व धुळवड साजरी करून मुलांनी आनंद साजरा केला. राहनाळ शाळेत होळी व धुळवड सणाच्यानिमित्ताने पारंपारिक होळी बरोबरच राजश्री पाटील, अनघा दळवी, चित्रा पाटील या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी बीट, गाजर, झाडाची पान फले, आणि हळद यांच्यापासून नैसर्गिक रंग तयार केले. आजूबाजूचा कचरा, शेणाच्या गोवऱ्या, कापूर, विद्यार्थ्यांच्या मनातील वाईट विचार जाळण्यासाठी होळीच्या भोवती पताका म्हणून मुलांच्या मनातील नकारात्मक कागदावर लिहून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थीनी सिद्धी व परी यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. यावेळी संध्या जगताप, रसिका पाटील यांनी होळीची पारंपरिक गीते सादर केली.
 
होलीकेची कथा अंकुश ठाकरे यांनी सांगितली. केंद्रप्रमुख शरद जाधव यांनी होळी सणाचा विज्ञानाशी असलेला संबंध उलगडून सांगितला. यावेळी ग्रामपंचायत लिपिक विश्राम नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू, सदस्य प्रतिभा नाईक व पालक उपस्थित होते. होळीसाठी जिवंत झाड तोडू नये, पाण्याची बचत करावी, केमिकल मिश्रित रंग वापरू नये, प्लॅस्टिक पिशव्या आणि फुगे एकमेकांवर मारू नये असा सल्ला उपक्रमाची संकल्पना असलेले शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी मुलांना दिला. या इकोफ्रेंडली होळीची चर्चा संपूर्ण राहनाळ गावात होत आहे.