मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार तीन जणांना जिवंत जाळले!

07 Jun 2023 16:17:16
 
Pratahkal - Udaipur News Update - Violence again in Manipur, three people were burnt alive!
 
इंफाळ : मणिपूरमध्ये (Manipur) हिंसाचाराच्या घटना अजूनही घडत आहेत. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शांततेचे आवाहन करूनही अनेक भागात कुकी समुदायावरची नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे.
 
काकचिंग जिल्ह्यातील सेरौ येथील सुगूनचे काँग्रेस आमदार के. रणजित यांच्या निवासस्थानासह ग्रामस्थांनी सुगनू येथे रिकाम्या असलेल्या १०० हून अधिक छावण्या पेटवून दिल्या. या छावण्यांत यूनायटेड कुकी लिबरेशन फ्रंटचे (युकेएलएफ) दहशतवादी थांबले होते. दरम्यान, तीन जणांना जिवंत जाळल्याचा प्रकार घडला असून त्यास अद्याप दुजोरा मिळालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये गेल्या चोवीस तासात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र त्यास अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. इम्फाळमध्ये एका जमावाने तीन लोकांना जीवंत जाळल्याचे म्हटले आहे. अन्य सूत्रानुसार त्यांना बेदम मारहाण करत ठार केल्याचेही म्हटले जात आहे. दोन वाहनांतून पीडित नागरिक लामसांग येथे जात असताना जमावाने हिंसाचार केला. मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यात (Western District) सोमवारी सकाळी दोन सशस्त्र गटांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जण ठार तर चार जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या जखमींना इंफाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
मणिपूरमध्ये महिनाभरापासून सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत किमान ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३१० जण जखमी झाले. मणिपूरच्या हिंसाचारामुळे निर्वासित झालेल्या नागरिकांसाठी सरकारने मदत छावण्या उभारल्या आल्या आहेत. सध्या २७२ छावण्या असून त्यात ३७ हजार ४५० नागरिक राहत आहेत.
 
गेल्या दोन दिवसांपासून दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात अनेक ठिकाणी संघर्ष सुरू आहे. काल रात्री झोपड्यांना आग लावण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बटालियन आणि सीमा सुरक्षा दल तसेच राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकाने ग्रामीण भागातील स्वयंसेवकासह नाजरेथ शिबिरात दहशतवाद्यांशी मुकाबला केला. बराच काळ गोळीबार झाल्यानंतर तेथून दहशतवादी पळून गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी या छावण्या पेटवून दिल्या. या छावणीत कुकी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. दुसरीकडे पश्चिम इम्फाळ जिल्ह्यातील के फायेंग येथेही सुरक्षा दल आणि कुकी दहशतवाद्यांत प्रचंड गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
दरम्यान, मणिपूरच्या सुरक्षा दलाकडून ठिकाठिकाणी कारवाई केली जात आहे. यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत लूटमार केलेले ७९० अत्याधुनिक आणि स्वयंचलित शस्त्रांत्रासह १० हजार ६४८ स्फोटके जप्त केली आहेत.
 
राज्यात तीन मे रोजी उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर दहशतवाद्यांनी पोलिस आणि अन्य सुरक्षा दलाकडून शस्त्रे पळविली होती. यानंतर राज्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी पोलिसांकडून शस्त्र जप्तीची व्यापक मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम ड्रोन आणि क्वाड काप्टरच्या देखरेखीखाली राबविली जात आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शस्त्रे हस्तगत करण्यात आले आहेत. लुटलेले शस्त्रे परत जमा करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. सध्या राज्यात आसाम रायफल्स आणि लष्कराचे सुमारे १० हजार जवान तैनात आहेत.
 

Powered By Sangraha 9.0