पाथरी नगरपरिषदेचा मोठा जमीन घोटाळा

सहकारी गृह. संस्थांच्या जागेवर उभारला टॉवर, आ. प्रविण दरेकरांचा विधानपरिषदेत गौप्यस्फोट

Pratahkal    18-Mar-2023
Total Views |

 Big land scam of Pathri Municipal Council-MLA Pravin Darekar
 
मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) : आज विधानपरिषदेत भाजपा (BJP) विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (MLA Pravin Darekar) यांनी परभणी (Parbhani) जिल्ह्यातील पाथरी नगरपरिषदेचा घोटाळा (Scam of Pathri Municipal Council) उघड केला. पाथरी नगरपरिषदेमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जागेवर परवानगी नसतानाही 'बाबा टॉवर' उभा केला आहे. हा सर्वात मोठा घोटाळा असून यात एका मोठ्या राजकीय नेत्याचाही समावेश आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोटही दरेकर यांनी यावेळी केला. तसेच या प्रकरणाची एसआयटीमार्फत किंवा मंत्रालयीन सचिव दर्जाची चौकशी लावावी आणि जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दरेकरांनी लक्षवेधीद्वारे केली.
 
सभागृहात बोलताना दरेकर म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील पाथरी (Pathri) नगरपरिषदेमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था यांनी सर्वे नंबर ९/१ आणि ८ चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतला आहे. जो १२ मीटर सर्व्हिस रोड आहे आणि ओपन स्पेस आहे तेथे व्यापारी संकुल बांधले आहे. त्याचा आराखडाही केलेला नाही. जी जागा गृहनिर्माण संस्थांना दिली होती त्या जागेवर परवानगी नसतानाही टॉवर उभारला. अनधिकृतपणे टॉवर उभारून तेथील गाळे भाड्याने देण्यात आले असल्याचेही दरेकर यांनी यावेळी म्हटले. तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रांतांनी दिलेला चौकशीचा अहवाल सभागृहात वाचूनही दाखवला. पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, या प्रकरणात एका मोठ्या राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे. यामध्ये सभासद चेंज करण्यात परभणी उपनिबंधक यांचा हात आहे. तेथील नगरपालिकेतील सीईओने साटेलाटे करून अशा प्रकारचे घोटाळे (Scams) केले आहेत. हजारो कोटींचा भ्रष्टाचार पाथरी नगरपरिषदेत नगरपालिका अधिकारी, राजकीय नेते, जिल्हा उपनिबंधक आणि नगररचनाशी संबंधित लोकांनी केला आहे. हे मोठे रॅकेट असून याप्रकरणी एसआयटी किंवा मंत्रालयीन सचिव दर्जाची चौकशी लावावी. नेमके हे प्रकरण काय आहे ते राज्यातील जनतेसमोर यायला हवे. या प्रकरणात नेमक्या कुठल्या राजकीय नेत्याचा हात आहे व जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर काय कारवाई करणार हे सांगावे, असेही दरेकर म्हणाले. तसेच सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे. केवळ चौकशी लावून विषय संपता कामा नये. याबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यामुळे सादर प्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल व्हावेत आणि एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली.
 
दरेकर यांच्या मागणीवर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले की, पाथरी गृहनिर्माण संस्था १९६४ साली स्थापन झाली आहे. ती स्थापन झाल्यावर गृहनिर्माण संस्थेच्या नियमावलीप्रमाणे ज्या अटी शर्थी होत्या ते त्यांनी फॉलो करावे हे लिखित द्यावे लागत नाही. पण इथे एक निश्चित आहे की काही गोष्टींत अनियमितता झालेली दिसत आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचे गठण केले जाईल. त्यात मंत्रालयातील अधिकारीही असतील. विभागीय आयुक्त हे सचिव दर्जाचे असतात. या प्रकरणाची दोन महिन्यात चौकशी करणार असून विभागीय आयुक्तांच्या समितीचा अहवाल आल्यावर जे अधिकारी किंवा अन्य कोणी यात सहभागी असेल त्यांना पाठीशी न घालता कारवाई केली जाईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले.