रेशन ५ वर्षे मोफत मिळणार!

पंतप्रधान मोदींकडून देशातील ८० कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट!

Pratahkal    05-Nov-2023
Total Views |
Modi announces five-year extension of free ration scheme for 80 crore Indians  
दुर्ग, दि. ४ (वृत्तसंस्था) : दिवाळीचा सण (Diwali festival) काही दिवसांवर आला आहे. त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशातील करोडो गरीब जनतेला मोठं दिवाळी गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशन योजनेचा (Free Ration Scheme) कालावधी पुढील पाच वर्षासाठी वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळं आता देशातील ८० कोटी लोकांना पुढील पाच वर्ष मोफत रेशन मिळणार आहे. यामुळं देशातील गरीब जनतेला दिलासा मिळाला आहे.
 
छत्तीसगडमधील दुर्ग येथे पंतप्रधान एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी मोफत रेशन योजनेला पाच वर्षे मुदतवाढ देण्याची घोषणा केली. या महिन्यात छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत. ९० जागांच्या छत्तीसगड विधानसभेसाठी ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत पीएम मोदींच्या या घोषणेला निवडणुकीशीही जोडले जात आहे.
 
कोरोना महामारी दरम्यान केंद्र सरकारनं पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. त्यावेळी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनसह अनेक कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. विशेषतः गरिबांना खाण्यापिण्याच्या संकटाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गरीब लोकांच्या मदतीसाठी मोफत रेशन योजना सुरु केली होती. ८० कोटी देशवासी या योजनेचा लाभ घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana) अंतर्गत लाभार्थ्यांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मिळतो. लाभार्थ्यांना हे धान्य मोफत मिळते. केंद्र सरकारने सर्वप्रथम ३० जून २०२० रोजी याची सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या ही योजना डिसेंबर २०२३ मध्ये म्हणजेच पुढील महिन्यात संपणार होती. आता ५ वर्षांच्या मुदतवाढीनंतर, लोकांना डिसेंबर २०२८ पर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 
उपराष्ट्रपती उद्या मुंबई दौऱ्यावर
मुंबई : उपराष्ट्रपती जगदीप धनखड ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आपल्या एक दिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपती मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था, आयआयटी मुंबईला भेट देणार आहेत. या भेटीत ते संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधतील.