पंढरी दुमदुमली !

कार्तिकी यात्रेसाठी सात लाख भाविक पंढरपूरला दाखल

Pratahkal    23-Nov-2023
Total Views |

vitthal 
 
पंढरपूर (सोलापूर), दि. २२ (वार्ताहर ) : कार्तिकी सोहळ्यासाठी (Karthiki Sohala) पंढरी नगरी सज्ज झाली असून, आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात सात लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. कार्तिकीला येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराला (vitthal mandir) आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराला पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांच्याकडून ५ टन फुलांच्या सजावटीचे काम केले आहे. सध्या दर्शन रांग गोपाळपूर येथील १० पत्राशेडमध्ये असून, भाविकांना दर्शनाला बारा तासांचा अवधी लागत आहे. मात्र, असे असले तरीही विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांमधील उत्साह कणभरही कमी होताना दिसत नाही. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहाटे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची (vitthal rakhumai) महापूजा संपन्न होणार आहे. सोबतच, मंदिराला ७०० वर्षापूर्वीचे पुरातन रूप देण्याच्या मंदिर विकास आराखड्याचा नारळ देखील फडणवीस यांच्या हस्ते फोडण्याची तयारी मंदिर प्रशासनाने केली आहे. त्यामुळे, ७३ कोटीच्या या आराखड्याच्या कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री आपल्या दौऱ्यात पंढरपूर (pandharpur) विकासाच्या २७०० कोटीच्या प्रकल्पाबाबत आणि कॉरिडॉरबाबत काय घोषणा करणार हे पाहावे लागणार आहे.