दाक्षिणात्य सुपरस्टार वरुण तेज आज अडकणार लग्नाच्या बेडीत

हळदी समारंभाचे फोटो आले समोर

Pratahkal    02-Nov-2023
Total Views |
varun tej 
 
दाक्षिणात्य सुपरस्टार (Southern superstar) 'मेगा प्रिंस' (Mega prince) वरुण तेज (Varun Tej) व लावण्या त्रिपाठीच्या (Lavanya Tripathi) लग्न सोहळ्याला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. इटलीमध्ये हा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात होत आहे. यासाठी अल्लू अर्जुन ते राम चरणपासून अनेक दाक्षिणात्य सुपरस्टार इटलीमध्ये आपल्या कुटुंबीयांबरोबर पोहोचले आहेत. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच वरुण तेजच्या हळदी समारंभाचे फोटो समोर आले आहेत.
 
अभिनेते, चित्रपट निर्माते नागबाबू व पद्मजा कोनिडेला यांचा मुलगा वरुण तेज देवराज व किरण त्रिपाठी यांची मुलगी लावण्या त्रिपाठीबरोबर आज लग्नबंधनात अडकणार आहेत. दुपारी २.४८ वाजता, या शुभ मुहूर्तावर दोघं सात फेरे घेऊन नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर रात्री ८.३० वाजता रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या लग्न सोहळ्यासाठी १२० पाहुणे इटलीत पोहोचले आहेत. यामध्ये वरुण व लावण्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी सहभागी झाले आहेत. नुकताच वरुण व लावण्याचा हळदी समारंभ (Haldi Samarambh) पार पडला. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 
हळदी सभारंभासाठी खास वर-वधुसह सगळ्या पाहुण्यांनी पिवळ्या रंगाचा पेहराव केला होता. वरुण पिवळ्या रंगाचा कुर्ता व पायजामामध्ये पाहायला मिळाला. तर त्याची होणारी पत्नी लावण्याने पिवळ्या रंगाची चोळी व पांढऱ्या रंगाचा लेहंगा घातला होता. एका फोटोमध्ये वरुण- लावण्याबरोबर दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी आणि त्याची पत्नी सुरेखा पाहायला मिळत आहे.
 
याआधी सोमवारी कॉकटेक पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी पांढऱ्या रंगाचा सॅटिन सूट आणि काळ्या रंगाच्या पॅन्टबरोबर बो-टाई या पेहरावात वरुण दिसला होता. तर लावण्या पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये पाहायला मिळाली होती.
 
दरम्यान, वरुणची होणारी पत्नी लावण्या ही देखील अभिनेत्री आहे. २०१७ साली 'मिस्टर' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली. या तेलुगू चित्रपटादरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली अन् मग त्याचं प्रेमात रुपांतर झालं. वरुणने २०१४ साली 'मुकंदा' (Mukunda)  या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर 'फिदा' (Fida), 'कांचे' (Kanche), 'लोफर' (Loafer) आणि 'इ३: फन ॲण्ड फ्रस्टेशन' (E3: Fun and Frustration) यांसारख्या चित्रपटामुळे त्याला लोकप्रियता मिळाली. लावण्याने तामिळ, तेलुगूमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती 'डूसुकेल्था' (Doosukeeltha), 'ब्रम्मन' (Brahman) आणि 'हॅप्पी बर्थडे' (Happy Birthday) यांसारख्या बऱ्याच चित्रपटात झळकली आहे.