सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून गोंधळ

पिता-पुत्राच्या खेळीमुळे काँग्रेसची नाचक्की!

Pratahkal    13-Jan-2023
Total Views |


Satyajit Tambe

मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) : नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने (Congress) अधिकृत उमेदवारी दिलेली असतानाही सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी त्यांचा मुलगा सत्यजितसाठी अधिकृत उमेदवारी मागे घेतल्याने त्यांच्यावर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. तांबे पिता- पुत्राच्या या खेळीमुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे.
 
सुधीर तांबे यांनी आत्तापर्यंत तीन वेळा काँग्रेसकडून निवडणूक लढवली आहे. यंदा ते चौथ्यांदा निवडणूक लढवणार होते. पण पक्षाने अधिकृत उमेदवारी देऊनही त्यांनी वरिष्ठांना न कळवताच परस्पर अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. पक्षाला न विचारताच त्यांनी मुलासाठी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता तांबे यांच्यावर कडक कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले बाळासाहेब थोरात हे नगर जिल्ह्यातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा आहेत. तरीही बाळासाहेब थोरात यांची इच्छा डावलून तांबे पिता-पुत्रांनी पक्षाला अंधारात ठेवले असे बोलले जात आहे.
 
सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. २०१४ ला त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती, यात ते पराभूत झाले होते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी त्यांच्यापुढील सर्वात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे मतदारसंघ. त्यांना स्वतःसाठी मतदारसंघ मिळत नव्हता. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) निवडून येतात, त्यामुळे ते जे उमेदवार देणार तोच निवडून येतो. त्यामुळे ही सगळी खेळी महत्वाची आहे. या खेळात तांबे पिता-पुत्रांनी बाळासाहेब थोरातांना अंधारात ठेवले, त्यामुळे काँग्रेसची जाहीर नाचक्की झालेली आहे.
 
सत्यजीत तांबे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला लावून तांबे कुटुंबाने एकप्रकारे काँग्रेसचा आदेश डावलला आहे. तर सत्यजीत तांबे खुद्द सहकार्यासाठी भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं म्हणत आहे. अर्थातच भाजपला (BJP) देखील सत्यजीत तांबे यांना अपक्ष उमेदवार असल्यामुळे पाठिंबा देणं जड जाणार नाही. मात्र या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस पक्ष बॅकफूटवर गेली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
काँग्रेसने अधिकृत एबी फॉर्म दिला असला तरी सुधीर तांबेंनी फॉर्म भरला नाही. दुसरीकडे सत्यजीत तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला असला तरी मी काँग्रेसचाच कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे, यावरुन त्यांनी भविष्यातील आपले सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. मुळात पक्षाच्या चिन्हावरचा उमेदवार निवडून येणं सहज शक्य असताना याच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीने फॉर्म भरल्याने पक्षशिस्तीचा भंग झाला आहे.